गांधी जिवंतच आहेत!


थोर व्यक्तींना दोन मरणे असतात. एकदा त्यांचे प्राण जातात तेव्हा आणि दुसऱ्यांदा त्यांच्या विचारांची हत्या केली जाते तेव्हा. मोहनदास करमचंद गांधी नावाचा महात्मा यास अपवाद. त्यांनापहिलेमरण आले वयाच्या ७९व्या वर्षी. एका माथेफिरूने त्यांच्या छातीत तीन गोळ्या डागल्या. ‘हे रामअसे अस्फुट उद्‌गार काढत तो वृद्ध महात्मा कोसळला. उद्या त्या घटनेस ७४ वर्षे होतील. त्यानंतर या इतक्या वर्षांत त्यांच्या हत्येचे प्रयत्न वारंवार झाले. काही स्वतःला गांधींचे अनुयायी म्हणणाऱ्या भोंदूंनी केले, काही विरोधकांनी. टिंगलटवाळी, चारित्र्यहनन, बदनामी, असत्ये, अपमाहिती, अपप्रचार ही या विरोधकांची अस्त्रे. पण मौज अशी, की त्यानेही गांधीजी संपले नाहीत. त्यांच्या खुन्याचे गोडवे गाणाऱ्या प्रवृत्तींनी त्यांना चरखा, चष्मा आणि खादीत गुंडाळण्याचा प्रयत्न केला, की एकदा त्यांना अशा प्रतिकांत कोंडले की त्यांचे विचार नामशेष होतील. परंतु त्याचाही परिणाम झाला नाही. गांधीजी मरत नसतात हे वारंवार सिद्ध होत राहिले आणि त्यामुळे अधिकच खवळलेले काही व्देष्टे गांधींच्या छायाचित्रांना गोळ्या घालत वा त्यांच्या मारेकऱ्यांचा जयजयकार करत आपला विखार ओकत राहिले. ७४ वर्षांपूर्वी मारण्यात आलेला तो वृद्ध या काही लोकांना आजही का खटकत आहे, हा खरा प्रश्न आहे. त्याच्या उत्तरातच या देशातील आजच्या विखारी वातावरणाची कारणमीमांसा दडलेली आहे.


गांधींबाबत विचार करताना एक बाब नीटच लक्षात घेतली पाहिजे, की ते आधी, मध्ये आणि अखेरीसही हिंदू आहेत. ते हिंदू धर्माचे अपत्य आहेत. त्यातील सर्वसमावेशकता, सहिष्णुता, विश्वात्मके देवे म्हणण्याची व्यापक दृष्टी याचे मूर्त स्वरूप आहेत. ते सेक्युलर होते आणिभूतां परस्परे जडो मैत्र जीवाचे' आणिविश्व स्वधर्मसूर्ये पाहोहाच त्यांचा सर्वधर्मसमभाव - सेक्युलॅरिझम होता. ज्यांना हिंदू धर्माची ही तत्वेच समजली नाहीत वा ती ज्यांच्या सत्ताकारणाच्या आड येतात, त्यांनी या मुद्द्यावर गांधींची टवाळी करावी, यात काही विशेष नाही. सोशालिस्ट भगतसिंगांना, सेक्युलर सुभाषबाबूंना त्यांच्या क्रांतिकारकत्त्वासाठी आपलेसे करू इच्छिणारे हिंदुत्ववादी गांधीजींची त्यांच्या अहिंसावादावरून यथेच्छ टिंगल करतात. पण तसे करून ते अंतिमतः हिंदू मतांचीच टवाळी करीत असतात. याचे कारण गांधींचा अहिंसा विचार काही आभाळातून पडलेला नाही. तो आला आहे धार्मिक तत्वज्ञानातून. ते जसे ख्रिश्चनांचे, बौद्धांचे, जैनांचे आहे, तसेच ते हिंदूंचेही आहे. ‘अहिंसा परमो धर्मःहा महाभारताच्या वनपर्वाचा, अनुशासनपर्वाचा संदेश आहे. पण गांधी जेवढे संत आहेत, तेवढेच राजकारणीही. अशी व्यक्तीच अहिंसेला, सत्याच्या आग्रहाला राजकीय अस्त्रात परावर्तीत करू शकते. त्यांची राज्यविषयक संकल्पनाही येते ती रामराज्याच्या नावाने. येथील हिंदुत्ववाद्यांनाही रामराज्याची मोठी ओढ. त्यालाच ते धर्मराष्ट्र म्हणतात. मग यात द्वंद्व कोठे आहे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एकीकडे प्रातःस्मरणीय असलेले गांधी त्यांच्याफ्रींजमंडळींना वध्य का वाटतात? याचे उत्तर आहे रामराज्याच्या व्याख्येत, स्वरुपात.


गांधींचे रामराज्य हे समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या मूल्यांवर आधारलेले राज्य होते. ते बहुजनांचे होते. लोकशाही ही त्याची व्यवस्था होती. तेथे वर्णश्रेष्ठत्वाला जागा नव्हती. गांधींचे आरंभीच्या काळातील विचार उद्धृत करून यावर आक्षेप घेणाऱ्या शहाण्यांची येथे कमतरता नाही. पण गांधींनीच हे सांगून ठेवलेले आहे, की त्यांचे आधीचे आणि नंतरचे मते यांत फरक आढळला तर तेथे नंतरचे मत हेच ग्राह्य मानावे. याचा अर्थ एवढाच की बदलतात ती माणसे असतात. दगड बदलत नसतात. तर गांधीजींच्या रामराज्याची ही ढोबळ व्याख्या. तीच राज्यघटनेत उतरलेली आहे. अतिरेकी हिंदुत्ववाद्यांचा त्यास सक्त विरोध. त्या विरोधाला मग फाळणीपासून, मुस्लिम अनुनयाच्या आरोपापर्यंत अनेक पदर आहेत. पण ते बुरखे आहेत. त्याच्या आत आहे तो गांधींच्या रामराज्य संकल्पनेस असलेला विरोधच. हे पाहिल्यानंतर एक प्रश्न येतो, की त्यांना हे रामराज्य नको आहे, तर मग नेमके कसे धर्मराज्य हवे आहे? याच्या उत्तरादाखल अनेक युक्तिवाद येतील. ‘हिंदू खतरे में’, फाळणी धर्मावर झाली तेव्हा भारत हे हिंदुराष्ट्र व्हावे हे त्यातील प्रमुख. पण ही झाली आवश्यकतेची कारणमीमांसा. तीही पुन्हा प्रतिक्रियावादीच. यातून त्यांना अपेक्षित असलेल्या हिंदुराष्ट्राचे स्वरूप काही स्पष्ट होत नाही. तेव्हा त्याचे उत्तर शोधावे लागते, त्यांचा विरोध कशाला आहे त्यात. त्यावरून त्यांना काय नको ते स्पष्ट होते. आणि लक्षात येते, की त्यांना हवा आहे आधुनिक तंत्र, मात्र मनुस्मृतीचे मंत्र यावर चालणारा भारत. हे कारस्थान यशस्वी तर होत नाही ना, असे वाटावे असे वातावरण आज सर्वत्र दिसते. पण त्यात एकच अडथळा आहे


या देशात गांधी नावाचा महान आत्मा अजूनही जिवंत आहे. कारण तो या मातीतला आहे, धर्मातला आहे. तो मंद तेजाने तळपणारा भारतीय संस्कृतीचा नंदादीप आहे. हा गांधीविचार द्वेषाच्या आगीने जळणारा आहे आणि विषाक्त शब्दशस्त्रांनी तुटणारा आहे. तो भारताचा विचार आहे


( शनिवारचे संपादकीयपुण्यनगरीता२९ जानेवारी २०२२ साठी.)


Popular posts from this blog

त्यांचे असत्याचे प्रयोग!

गांधी नावाचा गुन्हेगार!

‘कुजबूज क्लाऊड’जन्य प्रोपगंडावरील प्रभावी उतारा - गांधी का मरत नाही