त्यांचे असत्याचे प्रयोग!


गांधींविषयी गैरसमज पसरविणा-यात्यांचे चारित्र्यहनन करणा-या अशा अनेक गोष्टी पसरविल्या जात आहेत. त्यांची बनावट चित्रे तयार करून ती प्रसारित केली जात आहेत. याचा हेतू एकच असतो - गांधींचा सहिष्णुतेचासर्वधर्मसभावाचासत्य आणि अहिंसेचा विचार पुसून टाकणे. एकदा तो विचार मागे पडलाकी मग एक पुतळा म्हणून वा एक चष्मा म्हणून गांधींना मिरविण्यात या विरोधकांची काहीही हरकत नसते. आज त्या असत्याचे प्रयोग जोमाने सुरु आहेत 

 

महात्मा गांधींबाबत एक विचित्र प्रकार सध्या सुरू आहे. देशात भाजप सत्ताधारी आहे. या पक्षाचे सध्याचे सर्वोच्च नेते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. ते महात्मा गांधींची सातत्याने पाद्यपूजा करताना दिसतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था. गांधीजी हे तिला फारा वर्षांपासून प्रातःस्मरणीय आहेत. आणि याच संस्थेच्या परिघावर असलेल्या काही संघटनासंघीय-हिंदुत्वाचा विचार मानणा-या अनेक व्यक्तीभाजपचे अनेक नेतेत्यांचे ट्विटरवरील समर्थकजल्पक हे सारे महात्मा गांधींचा मनःपूर्वक द्वेष आणि नथुराम गोडसेवर हार्दिक प्रेम करताना दिसतात. यातील विसंगतीने अनेक जण अवाक् होताना दिसतात. वस्तुतः यात विसंगती नसून त्या संघीय धोरणाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गांधींना प्रातःस्मरणीय मानणा-यांतील या अनेकांची गांधी हे देशाचे गुन्हेगारच आहेत यावर प्रगाढ श्रद्धा असते. आपल्या पूण्यभू आणि पितृभूची फाळणी झाली ती गांधीगोंधळामुळेच अशीच त्यांची दाट समजूत असते आणि गांधींचा गौरव हा त्यांचा राजकीय नाईलाज असतो. अजूनही कोट्यवधी भारतीयांच्या मनात गांधींबद्दल आस्था आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर तर भारताची ओळख गांधींशिवाय अधुरीच असते. हे सारे टाळता न येणारे. त्यांचा राजकीय नाईलाज होतो तो यामुळे.  

या सर्व मंडळींच्या गांधीविरोधाची कारणे दडलेली आहेत गांधी ज्या पद्धतीचे धर्मकारणसमाजकारण आणि राजकारण करीत होते त्यात. गांधी हे कमालीचे धार्मिक. पण त्यांचा धर्म आणि त्यांचे अध्यात्म हे एकच होते. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि यामुळेच अनेक धर्मवाद्यांचा - मग तो हिंदू असो वा मुस्लिम वा ख्रिस्ती - गांधींच्या धर्मकारणाला विरोध होता. गांधी हे राजकारणीही होते. आपल्या हे लक्षातच येत नाहीकी पंचा नेसणाराउघडा राहणाराशेळीचे दूध पिणारा हा फकीर म्हातारा तेव्हाच्या भोळ्याभाबड्यागोरगरीबअडाणी भारतवासीयांचा नेता तर होताचपण या देशातील असंख्य बुद्धिमंत सुशिक्षितांनीही त्याचे नेतृत्त्व स्वीकारले होते. मोतीलाल नेहरूजवाहरलाल नेहरूसरदार वल्लभभाई पटेलनेताजी सुभाषचंद्र बोसडॉ. राजेंद्र प्रसादचक्रवर्ती राजगोपालाचारीमौलाना अबूल कलाम आझादजयप्रकाश नारायण अशी ती मंडळी. ते काही भोळेभाबडे नव्हते. गांधींचे राजकारण हेच देशाला स्वातंत्र्याकडे घेऊन जाणारे आहे हे त्यांना दिसत होते. हे राजकारण प्रस्थापित व्यवस्थेला हादरे देणारे आहे हेही ते अनुभवत होते. हे हादरे ज्यांच्या परंपरागत धर्मराजकीय हितसंबंधांच्या आड येत होते अशी मंडळी गांधींना विरोध करणारच होती. ती तेव्हाही करीत होतीच आणि त्यात केवळ हिंदुत्ववादीच होते असे मानण्याचे काही कारण नाही. गांधी शोषक भांडवलशाहीच्या विरोधात होते आणि या भांडवलशाहीच्या विरोधात असलेल्या साम्यवादाच्याही विरोधात होते. तेव्हाच्या काँग्रेसमध्ये हे दोन्ही गट होते आणि त्यांचा गांधीना विरोधच होता. या शिवाय गांधींना विरोध करणा-यांत सावरकरवादी होतेआंबेडकरवादी होतेतसेच जीनावादीही होते. गांधींवर मुस्लिम अनुनयाचा आरोप करणा-यांना हे माहितच नसतेकी मुस्लिम लीग ही गांधींच्या काँग्रेसला हिंदूंचा पक्ष मानत होती. आणि एका अर्थी ते खरेच होते. या देशात हिंदू हे बहुसंख्याक होते. मूठभर हिंदुत्ववादी सोडले तर ते सगळे हिंदू काँग्रेसबरोबर होते. अगदी आजही या देशातील काँग्रेस हा हिंदूबहुलच पक्ष आहे. आणि त्यामुळे गांधींच्या काँग्रेसला मुस्लिम लीग हिंदूंचा पक्ष मानत होती. लीग गांधींच्या विरोधात होती. आणि आजही तो विरोध कमी झालेला नाही. येथील सारेच अतिरेकी धर्मवादी या कमालीच्या धार्मिक माणसाच्या विरोधात आहेत.

पण या देशातील सारेच काही अतिरेकी धर्मवादी नाहीत. या देशातील असंख्य लोक विशुद्ध धार्मिक आहेत. धर्म ही पूर्णतः वैयक्तिक बाब असूनराज्यव्यवहारात धर्मपीठांचा वा संस्थांचा हस्तक्षेप असता कामा नये. याचाच अर्थ राज्य कोणतेही असो तेथे प्रत्येक नागरिकास आपल्या वैयक्तिक आयुष्यात धार्मिक आचरण करण्याचे वा पूर्ण स्वातंत्र्य असले पाहिजे. सेक्युलॅरिझमची ही साधी सोपी व्याख्या. ती गृहित धरलीतर कोणत्याही विशुद्ध धार्मिकतेचे सेक्युलॅरिझम हे अविभाज्य अंगच मानावे लागेल. अशाप्रकारची धार्मिक सेक्युलर मंडळी भारतात संख्येने नेहमीच मोठी होती आणि आहेत. वारकरी संप्रदाय हे त्याचेच एक उदाहरण. तर अशा प्रकारचे सर्व लोक गांधींवर आजही प्रेम करतात. जागतिकीकरण आणि त्यातून उद्भवलेल्या समस्या पाहात मोठ्या झालेल्या असंख्य तरुणांनाही आज गांधींमध्ये मार्गदर्शक दिसतो. अण्णा आंदोलनाबद्दल अनेकांचे मतभेद असतील. पण येथील तरुणांमध्ये आजही गांधींबाबत किती आस्था आहे हे त्याच आंदोलनाने अवघ्या जगाला दाखवून दिले होते हे विसरता येणार नाही. तर ही अशी यादी बरीच लांबवता येईल. पण

या दोन्हींच्या पलीकडे एक मोठा वर्ग भारतात आहे. त्याने गांधी वाचलेले नाहीत. त्याल गांधी वाचण्याचीसमजून घेण्याची गरज भासत नाही. तरीही त्याच्या मनात गांधींबद्दल अपार अनादर आहे. त्यांना गांधी हा एक विनोद वाटतो. त्यातील अनेकांच्या मनोधारणा तर गांधींवरील अश्लील विनोदांच्या संस्कारातूनच तयार झालेल्या असतात. हे लोक गांधींची टिंगलटवाळी करतात. हिंदूंच्या धर्मपरंपरेत महत्त्वाचे स्थान असलेल्या सत्य आणि अहिंसा या तत्त्वांची खिल्ली उडवतात. गांधींमुळे फाळणी झाली असे ठोकून देतात. प्रातःस्मरणीय’ गांधींना ते राष्ट्रपिता नव्हेतर राष्ट्रद्रोही मानतात.  

हे सारे येते कुठून हा खरा प्रश्न आहे. 

आणि त्याचे उत्तर दडले आहे कुजबूज आघाड्या आणि व्हाट्सॲप विद्यापीठातून चाललेल्या गांधीविरोधी प्रोपगंडात. गांधी म्हणजे साधेपणाचा आदर्श. त्यांचे बोलणेही साधेच. पण त्यातील विचार समजणे हे मात्र अनेकांच्या कुवतीबाहेरचे असे. यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही. अहिंसासत्यअस्तेयअपरिग्रह यासारखी तत्त्वे काही मूळ गांधीजींची नव्हेत. ती तर हिंदू धर्माच्या यमनियमांचा भाग आहेत. हजारो वर्षांपासून चालत आलेलीआपल्या धर्मग्रंथांनीऋषीमुनींनी सांगितलेली ही तत्त्वे. आता त्यांनी सांगूनही ती ज्या समाजाला नीट समजली नाहीतती गांधींनी सांगितली म्हणून समजतील असे मानण्याचे काहीच कारण नाही. आणि आपल्याला जे समजत नसतेत्याकडे एकतर दुर्लक्ष करायचे किंवा ते उडवून लावायचे ही तर सामान्यांची मानसिक संरक्षक यंत्रणा असते. अशा अवघड गांधींची टिंगलटवाळी करणे यात बौद्धिक श्रम अजिबातच नाहीत. परंतु गांधींच्या धर्मकारणाने आणि राजकारणाने ज्यांचे हितसंबंध धोक्यात आले होते त्यांनी लोकांच्या याच बौद्धिक आळशीपणाचा फायदा घेतला आणि गांधीनिंदेची एक परंपराच तयार केली. सामान्य लोकांवर ही निंदाभूल टाकण्यात आली. गांधींना विचारांच्या पातळीवर विरोध करणेत्यांची मते खोडून काढणे यात काहीच वावगे नाही. या पातळीवर कुणाला गांधी आवडत नसतील तर त्याला काहीच हरकत नाही. परंतु सत्य हाच परमेश्वर असे मानणा-या गांधींना गाडून टाकण्यासाठी नग्न असत्याचा आसरा घेण्यात येतो. चारित्र्यहननराक्षसीकरण अशी तंत्रे वापरली जातातआणि हे सारे धर्मसत्ता प्रस्थापित करण्याच्या नावाने केले जातेतेव्हा तो येथील परंपरांचासंस्कृतीचा नव्हे तर विशुद्ध धार्मिकतेचाही द्रोह असतो.  

हा जो गांधीविरोधी प्रोपगंडा आहे त्यात काही मुद्दे वारंवार येत असतात. अगदी वकिली थाटात आपल्याला सांगितले जातेकी गांधीजींच्या अहिंसेमुळेच राष्ट्र दुबळे झाले. हल्ली पं. नेहरूंवरील अनेकांचे प्रेम जरा जास्तच ऊतू चालले आहे. त्यामुळे असेही सांगितले जातेकी गांधींनी वल्लभभाई पटेल यांच्यावर अन्याय केला. त्यांना पंतप्रधान केले नाही. गांधींनी देशाची फाळणी केली हा मुद्दा तर सदाहरित. पण हे सारे गांधीनिंदकांचे असत्याचे प्रयोग आहेतहे नीट समजून घेतले पाहिजे. त्यातील काही मुद्द्यांचा येथून पुढे समाचार घेऊया…  

 

०००

 

गांधींच्या अहिंसेने खरेच राष्ट्र दुबळे झाले?

अहिंसा हा जसा हिंदू विचारांचा भाग आहेतसेच त्याला बौद्ध आणि जैन धर्मातही महत्त्व आहे. गांधीजी जेव्हा अहिंसेची गोष्ट करतात तेव्हा ते धर्म विचारच सांगत असतात. 

महाभारतात अनेक ठिकाणी अहिंसेबाबतचा हा संदेश आलेला आहे. उदा. अहिंसा परमो धर्मः स च सत्ये प्रतिष्ठित:। सत्ये कृत्वा प्रतिष्ठां तु प्रवर्तन्ते प्रवृत्तयः ।। (अहिंसा हाच सर्वांत मोठा धर्म आहे आणि तो सत्यावर आधारलेला आहे. सत्यावर निष्ठा ठेवूनच कार्य संपन्न होत असते. - वनपर्वअध्याय 207मार्कंडेयसमस्यापर्व)अहिंसा परमो धर्मस्तथाहिंसा परं तपः । अहिंसा परमं सत्यं यतो धर्मः प्रवर्तते ।। (अहिंसा परम धर्म आहे. अहिंसा परम तप आहे. आणि अहिंसाच परम सत्य आहे. अहिंसेमुळेच धर्माची प्रवृत्ती विकसित होते. - अनुशासन पर्वअध्याय 115 - दानधर्मपर्व.)  

आता यातही एक मौज आहे. गांधीजी महाभारतातीलच विचार सांगत असताना त्यांच्यावर तुम्ही टीका कशी करता असे कोणी विचारले तर काय सांगायचे हा येथील कर्मठ हिंदूंपुढील प्रश्न होता. त्यामुळे त्यांनी व्हाट्सअॅप विद्यापीठ हाताशी धरले आणि सांगण्यास सुरुवात केलीकी तो लबाड वृद्ध अर्धाच श्लोक सांगत होता. राजीव दीक्षित म्हणून या कुजबूज विद्यापीठाचे एक कुलगुरू होते. त्यांचा 23 मे 2013 चा फेसबुकवरील एक हिंदी लघुलेख आहे. त्यात ते म्हणतात - स्वतःत लढण्याचा दम नव्हता म्हणून गीतेतील श्लोक अर्धा करून लोकांना नपुंसक बनविले. अहिंसा परमो धर्मः - पूर्ण श्लोक का नाही सांगितला लोकांना?’ तो पूर्ण श्लोकही त्यांनी दिला आहेकी - अहिंसा परमो धर्मः धर्म हिंसा तथैव चः।। त्याचा अर्थ ते सांगतातकी यदि अहिंसा परम् धर्म हैतो धर्म के लिए हिंसा अर्थात् (कानून के अनुसार हिंसा) भी परम् धर्म है. अहिंसा मनुष्य का परम धर्म हैऔर धर्म की रक्षा के लिए हिंसा करना उस से भी श्रेष्ठ है…!! जब जब धर्म (सत्य) पर संकट आये तब तब तुम सस्त्र उठाना।’ आता हा जो तथाकथित पूर्ण श्लोक आहे त्याचा आणखी एक पाठभेदही आढळतो इंटरनेटवर. त्यात तथैवच्या ऐवजी तदिव हा शब्द वापरण्यात आला आहे. त्यातही आणखी एक विसंगती. राजीव दीक्षित सांगतातकी हा गीतेतील श्लोक आहे. काही जण सांगतातकी हा महाभारतातील श्लोक आहे. वस्तुस्थिती अशीकी तेथे कुठेही हा श्लोक आढळून येत नाही. पण या श्लोकाचा कोणताही संदर्भ वगैरे न देता तो व्हाट्सॲप विद्यापीठाचे स्नातक तो व्हायरल करताना दिसत आहेत.  असो.

तर मुद्दा असाकी अहिंसा हे तत्त्व काही मुळचे गांधींचे नाही. तरीही त्या तत्त्वाने राष्ट्र दुबळे झाले असा आक्षेप घेण्यात येतो. पण गांधींची ही अहिंसा भेकडांची नाही. ती शूरांची आहे. एखाद्याला मारण्याची क्षमता असूनही कोणी तसे करीत नसेलतर त्याला खरी अहिंसा म्हणतात. इतरांचे सोडाखुद्द गोळवल गुरुजींनी बंच ऑफ थॉटमध्ये याची ग्वाही दिलेली आहे. हे पुस्तक म्हणजे हिंदुत्त्ववाद्यांचा मॅनिफेस्टो’. त्यात गुरुजींनी गांधींबद्दलचा एक किस्सा सांगितला आहेकी एकदा अहमदाबादमध्ये दंगल झाली. मुस्लिमांनी हिंदूंवर हल्ला केला. ते घाबरून पळू लागले. तेव्हा गांधीजींनी त्यांना झापले. म्हणाले, ‘तुम्ही भेकडासारखे का वागतातुम्ही माझे नाव घेता. पोपटासारखे अहिंसा अहिंसा म्हणता आणि जीव वाचवण्यासाठी त्याचा आसरा घेत पळता. माझी अहिंसा ही घाबरटांची अहिंसा नाही. ती शूरांची अहिंसा आहे. असे घाबरून पळण्याऐवजी तुम्ही लढून मेला वा मारले असते तर बरे झाले असते.’ हे उद्‌गार असेच्या असे खरोखरच गांधीजींचे असोत वा नसोत. ते शूरांच्या अहिंसेचाच प्रचार करीत होते हे मात्र खरे. आता प्रश्न येतो तो राष्ट्राच्या दौर्बल्याचा. तर हा आरोप केवळ गांधींवरच नव्हेतर बौद्धांवरही केला जातो. पण ते काही खरे नाही. आपले राष्ट्र परकी आक्रमणासमोर पराभूत झाले ते केवळ अहिंसेच्या तत्वामुळे नव्हे. आणि स्वतंत्र भारतापुरते बोलावयाचे झाल्यासगांधींची अहिंसा आणि स्वतंत्र भारताचे संरक्षण धोरण यांत कुठेही मेळ नव्हता. स्वतंत्र भारतात गांधी केवळ पाच महिने हयात होते. ते असताना काश्मीरवर पाकिस्तानने हल्ला केलात्यावेळी काश्मीरच्या संरक्षणासाठी भारतीय लष्कराच्या जवानांना दिल्लीहून श्रीनगरला विमानाने पाठविण्याच्या कृतीचे गांधीजींनी स्वागतच केले होते. दुसरी बाब म्हणजेगांधी हे काँग्रेसचे नेते असलेतरी गांधींची सर्व धोरणे ही काँग्रेसची नव्हती. या देशाच्या अण्वस्त्र धोरणाची पायाभरणी नेहरूंच्या काळात झालेली आहेही बाब यासंदर्भात महत्त्वाची आहे. शिवाय भ्याडाच्या अहिंसेपेक्षा शूराची हिंसा बरी असेच गांधीजी म्हणत असत. तेव्हा त्यांच्या अहिंसेने राष्ट्र दुबळे झाले वगैरे म्हणणे हा शुद्ध असत्याचा प्रयोग आहे. 

 

०००

 

गांधींमुळे फाळणी झाली?

हिटलरने माईन काम्फमध्ये महाअसत्याचे - बिग लायचे - तत्व मांडले आहे. तो म्हणतोप्रचंड मोठ्या असत्यामध्ये एक जोरकस विश्वासार्हता असते. लोक छोट्या खोट्यापेक्षा मोठ्या खोट्याला हसतहसत बळी पडत असतात. आणि असे अत्यंत असत्य तुम्ही सातत्याने सांगत राहिलात की हळुहळू लोकांना तेच खरे वाटू लागतेहे गोबेल्सी तंत्र. गांधींमुळे फाळणी झाली या प्रोपगंडामध्ये या दोन्हींचा मिलाफ आढळतो. मुळात हिंदुस्थानात एक नव्हे,तर दोन राष्ट्रे नांदतात ही काही गांधींची वा काँग्रेसची भूमिका नव्हती. तिची मांडणी मुस्लिम लीगची. हिंदू महासभेलाही ते मान्य होते. डॉ. आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान’ या ग्रंथात त्यांचे फाळणीसंबंधीचे विचार मांडलेले आहेत. त्यात एके ठिकाणी हिंदू महासभेच्या अहमदाबाद अधिवेशनातील स्वा. वि. दा. सावरकर यांच्या भाषणातील एक उतारा उद्धृत करून आंबेडकर म्हणतात, ‘हे कदाचित विचित्र वाटेलपण एक राष्ट्र विरुद्ध द्विराष्ट्र या मुद्द्यावर श्री. सावरकर आणि श्री. जीना यांचा एकमेकांना विरोध असण्याऐवजी त्यांच्यात एकमत आहे.’ आणि एकदा येथे दोन राष्ट्रे आहेत असे म्हटलेकी मग प्रश्न उरतोकी त्यांना बांधून कसे ठेवायचे हा. त्यातील कोणा एकाचीही त्याला तयारी नसेलतर पुढचे सगळेच प्रयत्न फोल ठरतात. खुद्द आंबेडकरांनीही फाळणीचे जोरदार समर्थन केले आहे. आणि गांधीजी मात्र फाळणीच्या विरोधात होते. फाळणी माझ्या प्रेतावरूनच होईलहे त्यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. तसेच 1 जून 1947चे आज मी अगदी एकाकी पडलो आहे’, हेही त्यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. मुस्लिम लीग फाळणी मागत होती. हिंदूजन मुस्लिमांच्या विरोधात होते. यादवी युद्ध किंवा फाळणी हे दोनच पर्याय तेव्हा उपलब्ध होते. वातावरण द्वेषाने भारलेले होते. अशा काळात ३ जून रोजी त्यांनी माऊंटबॅटन योजनेला संमती दिली. त्यावरून त्यांच्यावर मोठी टीका होऊ लागली. फाळणीची परिस्थिती निर्माण करण्यात ज्यांचा वाटा होतातेच त्यांच्यावर टीका करीत होते हे विशेष. त्या टिकेला उत्तर देताना ९ जून रोजी ते म्हणाले होते, ‘जरी बिगर मुस्लिम भारत आपल्याबरोबर असता तरी आपण फाळणी रोखण्याचा मार्ग दाखवू शकलो असतो.’ असे असतानाही त्यांना फाळणीचे गुन्हेगार मानले जाते हे विशेष. ही म्हणजे एकत्र कुटुंबांतील दोन भावांनी हाणामा-या कराव्यातवेगळे व्हावे आणि मग आई-बापाला दोष द्यावा की तुमच्यामुळे घर फुटलेअशातली गत झाली. नेहरू-पटेलांना सत्तेची घाई झाल्यामुळे फाळणी झाली असेही एक असत्य वारंवार सांगितले जाते. तसे तर गांधींच्या आंदोलनांमुळे स्वातंत्र्य मिळाले नाहीअसेही असत्य सांगितले जातेच. पण त्या कशातच तथ्य नाही. देश तेव्हा स्वतंत्र झाला नसतातर तो जळतच राहिला असता हे एकदा नीट समजून घेतले पाहिजे. यासंदर्भात डॉ. आंबेडकरांचे एक विधान लक्षात घेण्यासारखे आहेकी पाकिस्तान काही काळाकरिता गाडले गेले तरी ते पुन्हा डोके वर काढणार नाही असे समजणे घोडचूक ठरेल.’ थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी एके ठिकाणी म्हटलेले आहेकी 35 कोटी हिंदूंचे जीवन उद्ध्वस्त करून अखंड भारत टिकविण्याइतके स्वप्नांचे प्रेम गांधी-नेहरू-पटेलांना नव्हते.’ फाळणीचा निर्णय झालेला आहे तो या भूमिकेतून.

फाळणी हा काही एका लेखात सामावणारा विषय नाही. तो समजून घेण्यासाठी इतिहास ग्रंथांकडे वळावे लागेल. येथे इतकेच समजून घ्यायचे आहेकी गांधी हे फाळणीचे गुन्हेगार नसूनधार्मिक आणि राजकीय वर्चस्वासाठी एकमेकांविरोधात लढणारे हीच खरी टुकडे टुकडे गँग’ आहे.  

 

०००

 

पंचावन्न कोटींचे प्रकरण

फाळणीच्या वेळी झालेल्या वाटणीनुसार पाकिस्तानला 75 कोटी रुपये द्यायचे ठरले होते. त्यातील 20 कोटी रुपये लगेच देण्यात आले. बाकीचे आपण देणारच होतो. तेवढ्यात टोळीवाल्यांच्या वेशात पाकिस्तानी लष्कराने काश्मीरवर हल्ला चढविला. काश्मीर हे तेव्हा स्वतंत्र संस्थान होते. तेथील हिंदू राजा हरिसिंग - काश्मिरी जनतेची इच्छा असूनही - भारतात सामील होण्यास तयार नव्हता. या हल्ल्यानंतर तो घाबरला. तेव्हा नेहरूंनी त्याच्यावर दबाव आणला. सामील झालाततर साह्य करू असे सांगितले. त्याने सामीलनाम्यावर सही केली आणि जम्मू-काश्मीर भारताचा भाग झाला. नेहरूंनी तेथे सैन्य पाठवले आणि पाकिस्तानला ते 55 कोटी आता विसरा असे सांगितले. तर या गडबडीत दिल्लीतील दंगली शांत करण्यासाठी गांधीजींनी उपोषण सुरू केले होते. हे 55 कोटींचे प्रकरण समजल्यानंतरलॉर्ड माऊंटबॅटन यांच्या विनंतीवरून त्यांनी तो मुद्दाही घेतला. एका राष्ट्राने दिलेला शब्द फिरवणे त्यांच्या धार्मिक नैतिकतेत बसत नव्हते. तर ही बाब न पटल्यामुळे नथुराम गोडसे याने त्यांची हत्या केली असे सांगितले जाते. वस्तुतः त्यात तथ्य नाही. गांधींच्या हत्येशी या 55 कोटींचा संबंध आहे असे म्हटलेतर मग 1948 पूर्वी गांधींच्या हत्येचे किमान सहा प्रयत्न झाले होतेत्याचे काय करणारजी. डी. तेंडुलकर यांनी लिहिलेले गांधीचरित्र हे अत्यंत अधिकृत मानले जाते. त्याच्या तिस-या खंडातील विसाव्या प्रकरणात त्यांनी गांधींवरील बॉम्बहल्ल्याची माहिती दिली आहे. तो हल्ला झाला होता पुण्यात. त्यामागे पुण्यातल्या सनातन्यांचा एक गट होता. ही घटना 1934ची आहे. खुद्द नथुराम गोडसेनेच 1944 साली गांधींवर दोनदा सुराहल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही फाळणी झालेली नव्हती की 55 कोटींचे प्रकरण उद्भवलेले नव्हते. मग ते प्रयत्न का झालेयाचे उत्तर गांधींच्या धर्म-राजकारणात शोधावे लागेल. त्यांच्या राजकारणाने येथील तथाकथित उच्चवर्णीय वर्चस्वावर केलेल्या प्रहारात शोधावे लागेल. 

 

०००

 

गांधी आणि भगतसिंग

तेच लोक गांधी बनतातज्यांच्यात भगतसिंग बनण्याची क्षमता नसते’, असे सांगणारे एक मीम हिंदुत्त्ववादी जल्पकांनी 2019च्या गांधीजयंतीच्या दिवशी प्रसृत केले. या देशातील तरुणांना भगतसिंगांचे मोठे आकर्षण आहे. त्याचा वापर करून घेऊनभगतसिंगांना गांधींविरोधात उभे करायचे असा त्यामागील डाव. मुळात त्यांना भगतसिंग हे साम्यवादीडावे होते याचा पत्ता नाही. भगतसिंग हे साम्यवादी होतेनिधर्मी होतेनास्तिक होते आणि त्यांचा येथील धर्मवादी शक्तींच्या द्वेषयुक्त राजकारणाला तीव्र विरोध होता. हे सत्य असलेतरी केवळ गांधींना खलनायक ठरविण्यासाठी येथील उजव्या शक्ती भगतसिंग यांच्या नावाचा वापर करून घेत असतात. त्यासाठी गांधींवर सतत एक आरोप केला जातोकी त्यांनी भगतसिंग यांची फाशी रोखली नाही. काहींचे म्हणणे तर असे असतेकी भगतसिंग यांच्यामुळे आपला प्रभाव कमी होईल अशी गांधींना भीती होती. म्हणून त्यांनी त्यांना फासावर जाऊ दिले. या अशा आरोपांना अर्थातच काहीच आधार नसतो. 

मुळात येथे हे कोणी लक्षातच घेत नाहीकी खुद्द भगतसिंग-राजगुरू-सुखदेव यांचा फाशीमाफीला विरोध होता. त्यांना ब्रिटिश सरकारची माफीदया नको होती. देखो भाईफांसी रुकनी नहीं चाहिये’ हे लाहोर कारागृहात बिजॉय कुमार सिन्हा यांच्याकडे भगतसिंग यांनी काढलेले उद्‌गार आहेत. आणि गांधीजी हे अहिंसेचे उपासक होते. भगतसिंगांसारख्या क्रांतिकारकांच्या राष्ट्रप्रेमाचे कौतुक होते त्यांना. पण राजकीय हिंसेच्या पार्श्वभूमीवरील हे राष्ट्रप्रेम हे भरकटलेले असल्याचे त्यांचे मत होते. दुसरीकडे कोणाला फाशी द्यावी यालाही त्यांचा विरोध होता. 7 मार्च 1931 रोजीचे त्यांचे विधान आहेकी भगतसिंग यांच्यासारख्या शूरवीरालाचा नव्हेतर कोणालाही फासावर चढवावे हे माझी विवेकबुद्धी मान्य करूच शकत नाही.’ ब्रिटिश पोलिस अधिकारी जॉन साँडर्स याची हत्या हे क्रूर कृत्य’ असल्याचे म्हणतानाचत्यांनी त्यासाठी ब्रिटिश सरकारला जबाबदार धरले होतेहेही येथे लक्षणीय आहे.  


ही फाशी रोखण्यासाठी गांधींनी नक्कीच प्रयत्न केले होते. आणि अनेक इतिहासकार सांगतात त्याप्रमाणे फाशीनंतर नव्हेतर फाशीच्या किती तरी दिवस आधी. भगतसिंगसुखदेव थापर आणि शिवराम राजगुरु यांच्यावरील खटला ओळखला जातो लाहोरकट खटला म्हणून. तो खटला चालवण्यासाठी सरकारने विशेष लवाद नेमला होता. 4 मे 1930 रोजी - भगतसिंग यांना फाशी होण्याच्या सुमारे वर्षभर आधी - व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन ला पत्र पाठवून गांधीजींनी त्याला तीव्र विरोध दर्शविला होता. हा छुपा मार्शल लॉ आहे असे त्यांनी त्यात म्हटले होते. 31 जानेवारी 1931 रोजी अलाहाबाद येथे बोलताना त्यांनी पुन्हा भगतसिंग यांच्या फाशीला विरोध दर्शविला होता. 11 फेब्रुवारी 1931 नंतर हे स्पष्ट झाले होतेकी व्हाइसरॉयच्या हस्तक्षेपाखेरीज भगतसिंग आणि इतरांची फाशी रद्द होणे अशक्य आहे. नेमक्या याच काळात गांधी-आयर्विन चर्चा होणार होती. प्रश्न भारताच्या स्वातंत्र्याचा होता. त्याच चर्चेत भगतसिंग यांच्या सुटकेची मागणी मांडावी यासाठी गांधीजींवर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मोठा दबाव होता. पण गांधींनी त्या वाटाघाटीत हा विषय घेण्यास नकार दिला. यावर स्वतंत्रपणे चर्चा केली जाईल असे सांगितले. आणि त्यानुसार 18 फेब्रुवारी रोजी त्यांनी आयर्विन यांच्याशी त्याबाबत चर्चाही केली. तुम्हाला देशातील वातावरण अधिक अनुकूल व्हावे असे वाटत असेलतर भगतसिंग यांची शिक्षा स्थगित कराअशी मागणी त्यांनी केली. आपण त्यावर विचार करू असे आयर्विन यांनी त्यांना सांगितलेही. टीकाकारांचे असे म्हणणे आहे की गांधींनी शिक्षा स्थगितीची नव्हेतर रद्द करण्याचीच मागणी करावयास हवी होती. वस्तुतः या शिक्षेबाबत एकदा प्रिव्ही कौन्सिलने निर्णय दिल्यानंतर कायदेशीरदृष्ट्या व्हाइसरॉयला त्यात हस्तक्षेपाचा अधिकार नव्हता. सर तेजबहादूर सप्रू यांच्यासारख्या कायदेतज्ञाने या खटल्यातील कायदेशीर बाबींविषयी आधीच व्हाइसरॉयशी चर्चा केली होती. पण त्याचाही उपयोग झाला नाही. आणि त्यामुळेच गांधींनी रद्द करण्याऐवजी स्थगितीचा पर्याय स्वीकारला. त्याद्वारे कालहरण करण्याचा त्यांचा डाव होता. 

एवढे करूनच गांधी थांबलेले नाहीत. त्यांनी 19 मार्च रोजी आयर्विन यांच्याकडे तो विषय पुन्हा काढला. त्या बैठकीची आयर्विन यांनी जी मिनिट्स’ नोंदविली आहेतत्यानुसार गांधींनी भगतसिंग यांची फाशी स्थगित करण्याचा विषय काढल्यानंतर आयर्विन यांनी त्यांना स्पष्ट सांगितलेकी मला माझ्या सद्सद्विवेक बुद्धिला पटेल असा एकही मुद्दा सापडलेला नाही की ज्या आधारावर फाशी स्थगित करावी.  आयर्विन लिहितातकी मी विविध मुद्‌द्यांवर गांधीजींची मागणी फेटाळली. 1. फाशीचा आदेश निघालेला असताना केवळ राजकीय कारणांसाठी ती पुढे ढकलणे मला अयोग्य वाटले. 2. फाशी पुढे ढकलली तर (साँडर्स यांच्या) मित्र आणि नातेवाईकांना असे वाटले असते की मी शिक्षा रद्द करण्याचा विचार करतोय. ते मला अमानुष वाटले.’ गांधीजी यावर काहीच बोलू शकले नाहीत. पण दुस-या दिवशी त्यांनी केंद्रीय गृहसचिव हर्बर्ट इमर्सन यांच्याशी प्रदीर्घ बोलणी केली. 

यानंतर गांधीजींनी एक वेगळाच पर्याय हाताळला. शिक्षा माफ झाल्यास आपण हिंसाचाराच्या मार्गाचा त्याग करू असे पत्र भगतसिंग आणि इतरांनी लिहावे. त्या आधारे सरकारवर दबाव आणावा अशी त्यांची योजना होती. त्यासाठी त्यांनी असफ अली यांना तुरुंगात पाठविले. पण सरकारने ती भेटच होऊ दिली नाही. 

यानंतर 21 मार्च रोजी गांधीजी पुन्हा आयर्विन यांना भेटले. फाशी पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी पुन्हा केली. त्यात काही निष्पन्न न झाल्यानेते दुस-या दिवशीही आयर्विन यांना भेटण्यास गेले. तुमच्या मागणीबाबत विचार करू असे व्हाइसरॉयने सांगितल्यावर गांधीजींच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यांनी 23 मार्च रोजी सकाळी आयर्विन यांना एक वैयक्तिक पत्र पाठविले. लोकभावनादेशांतर्गत शांतताक्रांतिकारकांची हिंसाचार सोडण्याची ऑफरखटल्यात कायदेशीर त्रुटी असल्याच्या शक्यता असे विविध मुद्दे मांडून त्यांनी फाशी रद्द करण्याची जोरदार मागणी केली. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ब्रिटिश सरकारने त्याच दिवशी सायंकाळी त्या तिन्ही क्रांतिवीरांना फाशी दिली.  

ही फाशी जेवढी भारतीय भावनांचीप्रयत्नांची हार होतीतेवढीच ती ब्रिटिश प्रशासकीय व्यवस्थेचीत्यातही पंजाबातील ब्रिटिश सनदी अधिका-यांची जीत होती. एका ब्रिटिश पोलिस अधिका-याची हत्या करणा-यांना मृत्यूदंडच देण्यात यावा यासाठी ब्रिटिश आयसीएस केडर प्रचंड आग्रही होती. आयर्विन हे गांधीजींच्या दबावाला बळी पडतात की काय अशी शक्यता एका क्षणी निर्माण झाली होती. परंतु त्यावेळी पंजाबच्या गव्हर्नरने त्यांना राजीनाम्याची धमकी दिली. इतरही अनेक ब्रिटिश अधिकारी त्याच मताचे होते. त्यांच्यादृष्टीने भगतसिंग-सुखदेव-राजगुरू यांचे ते कृत्य म्हणजे भारतात कार्यरत असलेल्या ब्रिटिश आयसीएस अधिका-यांच्या अधिकाराला दिलेले थेट आव्हान होते. 15 एप्रिल 1931चा एक बोलका गुप्तचर अहवाल आहे. त्यात म्हटले होतेकी सरकारचे समर्थक आणि अधिकारी यांच्यासाठी या फाशीच्या शिक्षेची अमलबजावणी ही एखाद्या अत्यावश्यक टॉनिकप्रमाणेच होती यात काहीही शंका नाही.

गांधीजींनी प्रयत्न केले. ते अयशस्वी ठरले. हे प्रयत्न जोरदार नव्हतेवगैरे गोष्टी म्हणणे सोपे आहे. गांधीजींच्या आंदोलनांनी ब्रिटिश सरकारवर काहीही परिणाम होत नव्हता असे म्हणणारे लोकच गांधींनी यावर उपोषण का केले नाहीआंदोलन का छेडले नाही वगैरे म्हणतात तेव्हा ते खासच हास्यास्पद ठरते. भगतसिंग हे कम्युनिस्टनास्तिकनिधर्मी. आज ते असते तर त्यांची शहरी नक्षलवादी म्हणूनच येथील अतिराष्ट्रवाद्यांनी संभावना केली असती. भगतसिंग आणि गांधीजी यांच्या विचारसरणीत टोकाचे अंतर. असे असले तरी एक देशप्रेमी क्रांतिकारक म्हणून गांधीजी आणि त्यांची काँग्रेस यांनी त्यांना वाचविण्याचे काही प्रयत्न तर नक्कीच केले. 

मात्र संपूर्ण देश त्यावेळी गांधीजींच्या विरोधात गेला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांचा असंतोषाचा सामना करावा लागला होता त्यांना. हे क्रांतिवीर शहीद झाल्यानंतर देशभरात निदर्शनांचा वणवा पेटला होता. विशेष हेकी भगतसिंग यांना वाचविण्यासाठी गांधीजींनी काय केले हे आज विचारीत असलेल्या संघटना तेव्हा हातावर हात बांधून बसल्या होत्या. आता मात्र त्यांची कुजबूज विद्यापीठे नवनवा इतिहास मांडू लागली आहेत. गतवर्षी नरेंद्र सहगल नामक एका संघप्रचारक-पत्रकाराने राजगुरुंवर लिहिलेल्या पुस्तकात कहरच केला. राजगुरु हे संघस्वयंसेवक होते असे त्याने ठोकून दिले. उद्या या अशा पुस्तकांचेच हवाले देत लोक समाजमाध्यमांतून पोस्ट्स फिरवत राहणार… कुजबूज विद्यापीठे चालतात ती या अशा अभ्यासक्रमावर.  

 

०००

 

गांधींविषयी गैरसमज पसरविणा-यात्यांचे चारित्र्यहनन करणा-या अशा अनेक गोष्टी पसरविल्या जात आहेत. त्यांची बनावट चित्रे तयार करून ती प्रसारित केली जात आहेत. गांधीजी यांचे ब्रह्मचर्याचे प्रयोग हे तर काही मंडळी अगदी चवीचवीने चघळत असतात. लैंगिकदृष्ट्या कुपोषितांचे आणि विकृतांचे त्यातून विकारी रंजन होते एवढेच. गांधींना सतत मुली लागत हे ठाकरी’ वाक्य. याहून अधिक असभ्यतेने त्यांच्याबद्दल बोलले जात आहे आणि अशा गावगप्पा पसरविणारी मंडळी मात्र राष्ट्रीय चारित्र्याच्या निर्माणाच्या बाता मारीत असतात! गांधी आणि सुभाषबाबूगांधी आणि पटेल व नेहरू यांच्याबाबतही अशाच अफवा पसरविल्या जात असतात. हे सारे फार नियोजनबद्ध पद्धतीने चाललेले असते. आणि त्याचा हेतू एकच असतोया समाजमनावर असलेला गांधी नामाचा पगडा दूर करणेगांधींचा सहिष्णुतेचासर्वधर्मसभावाचासत्य आणि अहिंसेचा विचार पुसून टाकणे. एकदा तो विचार मागे पडलाकी मग एक पुतळा म्हणून वा एक चष्मा म्हणून गांधींना मिरविण्यात या गांधीनिंदकांची काहीही हरकत नसते. आज त्या असत्याचे प्रयोग जोमाने सुरु आहेत. भारतीयत्वावरया देशाच्या संस्कृती आणि परंपरांवर प्रेम असणारांसमोरचे ते मोठेच आव्हान आहे. 


( सकाळ दिवाळी अंक - परिसंवादासाठी लेख - २० ऑक्टोबर २०१९)

Popular posts from this blog

गांधी नावाचा गुन्हेगार!

‘कुजबूज क्लाऊड’जन्य प्रोपगंडावरील प्रभावी उतारा - गांधी का मरत नाही