गांधीनिंदेची ‘उत्तर’पूजा!

गांधी नावाच्या एका लुच्च्यालबाडबाईलवेडय़ा आणि मुस्लीमधार्जिण्या पापी माणसामुळेच पवित्र भारताची वाट लागली’ यासारखे वाक्य अनेक मनांच्या कोऱ्या पाटय़ांवर लिहिण्याचे सामथ्र्य गेल्या अनेक वर्षांच्या गांधीनिंदेत हल्ली समाजमाध्यमांमुळे आले आहे.. तो अपप्रचार साधार खोडून काढण्याचेगांधीनिंदकांना निरुत्तर करण्याचे सज्जड साधन म्हणजे हे पुस्तक.. त्यासाठी ३० जानेवारी’ हे एक निमित्त!

00

हळूहळू विष पेरीत जावे.. सातत्यानेकणाकणानेकुणाच्याही नकळत आणि एके दिवशी उठून पाहावे तर सगळीकडे विषाची जंगले उठली आहेत. गांधीविरोधी प्रचाराचे हे असे झाले आहे. महात्मा म्हणून ओळखला जाणारा हा म्हातारा कधीच अजातशत्रू नव्हता. अहिंसेचे तत्त्वज्ञान सांगायचे ते. पण त्यांना शत्रू भरपूर होते. म्हणजे त्यांच्या काँग्रेस नामक पक्षाचे सदस्य बहुसंख्य हिंदू. त्यामुळे ती हिंदूंची सर्वात मोठी संघटना म्हणून मुस्लीम लीगचे नेते त्यांना हिंदूंचे नेते म्हणायचे. या हिंदूंमधील काहींना गांधींची धार्मिक आणि जातीविषयक मते अमान्य असत. त्यांना मुस्लिमांचा द्विराष्ट्रवादही अमान्य असे. पण हे राष्ट्र हिंदुराष्ट्र व्हावे असे त्यांना वाटत असे. ती मंडळी गांधींवर मुस्लिमांचा अनुनय करीत असल्याचा आरोप करीत. समाजवादी आणि साम्यवादी मंडळींना गांधी समग्र मान्य नसत. ते त्यांच्यावर साम्राज्यशहांचे हस्तक असल्याची टीका करीत आणि या लोकांचे जे विरोधक ते गांधींच्या ग्रामस्वराज्यसारख्या संकल्पनांना विरोध करीत. दलितांचे प्रश्न राष्ट्रीय चळवळीच्या केंद्रस्थानी आणणारे गांधी. पण त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता आणि आंबेडकर जो विचार घेऊन लढत होतेत्याला छेद देणारा जो हिंदुत्वाचा विचार- तो मांडणारे स्वातंत्र्यवीर सावरकरही गांधींच्या विरोधात होते.. आणि या सगळ्याच्या वर पुन्हा गांधीजी उभेच होते. त्यांच्यामागे हिंदुस्थानातील कोटय़वधी लोक होते. ही गांधीभूल अजब होती. त्या काळात त्यांची टिंगलटवाळी करणारे अनेक नेतेपत्रकार यांच्या स्मृतीही आज काळाच्या प्रवाहात पुसून गेल्या आहेत आणि हा नंगा फकीर’ काळाची बंधने ओलांडून आजही बराक ओबामा यांच्यासारख्या अनेकांना प्रेरणा देत आहे.

गांधीगारूड’ उतरल्याशिवाय या देशाचे काही भले होणार नाहीअसे मानणारे पूर्वीही होते. आजही आहेत. त्यांना प्रामाणिकपणे तसे वाटत असेलतर त्याला कोणाचीही हरकत असायचे कारण नाही. गांधी हे स्वातंत्र्याच्या चळवळीत उतरले. तोवर सनदशीर मार्गाने समाजातील उच्चवर्णीय उच्चशिक्षितांच्या हातात असलेली ही चळवळ त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने तेल्या-तांबोळ्यांपर्यंत आणि स्त्री-शूद्रांपर्यंत गेली आणि त्यामुळे या वर्गाचे स्थान डळमळीत झाले याची खंत ज्यांच्या मनात आहे त्यांनी ती गांधींना प्रखर विरोध करून व्यक्त करावीयात काहीही गैर नाही. आज जे गांधींना मनापासून महात्मा वा राष्ट्रपिता मानतातज्यांच्या मनात गांधींबद्दल आदर आहे अशा विचारी जनांनाही समग्र गांधी मान्य असणे शक्य नाही. हा माणूस बहुआयामी होता. ते समग्रपणे जसे आहे तसे’ या तत्त्वावर केवळ भक्तांनाच वंदनीय ठरू शकतात. इतरांना नाही. तेव्हा गांधींवरील टीकेचे त्यांना मानण्यारांनाही वावडे असण्याचे कारण नाही. रास्त टीकेचे उत्तर योग्य पद्धतीने देता येते. आरोप खोडून काढता येतात. असत्यअर्धसत्य आणि अफवा यांचा हात धरून चाललेला प्रोपगंडा खोडून काढणे फार कठीण असते. गांधींविरोधात अनेक वर्षांपासून अशा अपप्रचाराचे विष पेरले जात होते. गेल्या काही वर्षांत ते टारफुल्यासारखे तरारले आहे. इंटरनेट हे त्याच्या वहनाचे प्रमुख माध्यम ठरले आहे. पूर्वी कुजबुज आघाडय़ांतून होणारी गांधीनिंदा हल्ली संकेतस्थळेऑनलाइन कट्टे आणि व्हॉट्सअ‍ॅपचे गट अशा माध्यमांतून सर्रास सुरू आहे. ते पाहून इतिहास आणि विवेक यांच्याशी दुरूनच परिचय असलेल्यांना वाटावेकी गांधी नावाच्या एका लुच्च्यालबाडबाईलवेडय़ा आणि मुस्लीमधार्जिण्या पापी माणसामुळेच पवित्र भारताची वाट लागली. नाही तर आज हे राष्ट्र आपल्या लाडक्या अमेरिकेसारखे असते. या अपप्रचारास हिंदुस्थानी संस्कृतीचे विरोधक जसे कारणीभूत आहेततितकेच जबाबदार आहेत गांधींचे उठताबसता नाव घेणारे काँग्रेसजन. त्यांनी गांधींना प्रचंड स्वस्त केले. त्या नावाआड आपली सारी पापे लपवून गांधीविचारांची चव सांडली. हा सारा अपप्रचार सुरू असताना त्याचा प्रतिवाद करणे दूरचत्याला बळ मिळेल अशा पद्धतीनेच ते वागत राहिले.

पण गांधीविरोध केवळ चारित्र्यहननाच्याच मार्गाने सुरू आहे असे नाही. एखादी व्यक्ती वा विचार संपवायचे असतीलतर त्यासाठीचा एक रामबाण उपाय आपण भारतीयांनी शोधून काढला आहे. तो म्हणजे ती व्यक्ती वा विचार यांचे सम्मीलीनीकरणअपहरण. डॉ. बाबासाहेब आंबेडकरसरदार वल्लभभाई पटेलनेताजी सुभाषचंद्र बोसशहीद कॉम्रेड भगतसिंग यांचे संघविचारी संस्थांकडून होत असलेले अपहरण ही याची उदाहरणे. या चौघांचे आणि संघाचे विचार जुळणे अशक्यच. पण ते अशा काही खुबीने जुळवून दाखविले जातात की कोणास वाटावे हे पूर्वी शाखेवरच जात. आता मी नास्तिक का आहे?’ अशी पुस्तिका लिहिणारेडावेसेक्युलरसोशालिस्ट भगतसिंग हे हिंदुत्ववाद्यांचे प्रेरणास्थान कसे असू शकतातसंघपरिघावर वावरणाऱ्या काही टपोरी संघटना त्यांचे नाव कसे घेऊ शकतातपरंतु एकंदरच असा वैचारिक गोंधळ उडवून देऊन या व्यक्तींचे विचार नामोहरम करणे हा यातील कावा आहे. गांधींबाबतही तोच डाव टाकण्यात आला आहे. यातून दोन गोष्टी साध्य होतात. गांधींचा चष्मा आणि चरखा आपणांस मिरवता येतो आणि त्यामागील विचार सहजी नामशेष करता येतो. हळूहळू मग चष्मा आणि चरख्यामागचे गांधीही काढून फेकून देता येतात. बियाँड डाऊट – ए डोसिएर ऑन गांधीज् असॅसिनेशन’ या पुस्तकातून नेमके यावरच बोट ठेवण्यात आले आहे. तिस्ता सेटलवाड यांनी संकलित केलेल्या लेखांचे आणि पुस्तकांचे हे पुस्तक. तिस्ता यांची दीर्घ प्रस्तावनाही त्यास असूनआत अर्कायव्हल ट्रथ्सरिबटिंग आरएसएस स्टोरी आणि आरएसएस स्पीक असे तीन विभाग आहेत. त्यांबद्दल सांगण्याआधी तिस्ता यांच्याबद्दल बोलणे गरजेचे आहे. त्या गुजराती हिंदू. भारताचे पहिले अटर्नी जनरल एम सी सेटलवाड यांच्या कन्या. गुजरातमध्ये सामाजिक कार्य करतात. २००२च्या गुजरात दंगलीप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भरण्यात आलेल्या खटल्यातील त्या सहवादी आहेत. स्वाभाविकच त्या मोदीभक्तांच्या द्वेषलक्ष्य आहेत. तेव्हा त्या किती भ्रष्टऐयाशचोर वगैरे आहेत याच्या ठळक कहाण्या ऐकू येतात यात काही नवल नाही. त्यांच्यावर याप्रकरणी न्यायालयात खटलाही सुरू आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर त्यांनी संकलित केलेले पुस्तक बाद करणे सोपे आहे. व्यक्ती काय बोलते याऐवजीती कोण आहेतिचे हेतू काय आहेत अशा गोष्टींवर प्रहार करून तिच्या मतांचे महत्त्व ठरविण्याची वैचारिक लबाडी आपल्याकडे साथीच्या रोगासारखी पसरलेली आहे. ती लबाडी करायची की नाही हा ज्याच्या-त्याच्या प्रामाणिकपणाचा प्रश्न. गांधीविचारांचा वध करण्यासाठी हल्ली काय केले जात आहे हे समजून घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मात्र हे पुस्तक लक्षणीय आहे.

गांधीजींच्या संदर्भात संघाच्या काही विशिष्ट जाहीर भूमिका आहेत. त्यांतील एक म्हणजे गांधीहत्येशी संघाचा संबंध नाही. नथुराम संघस्वयंसेवक नव्हता. दुसरी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांची संघाप्रति सहानुभूती होती. त्यांनी संघाला क्लीन चीट’ दिली होती. आणि तिसरी म्हणजे गांधी हे संघास प्रात:स्मरणीय आहेत. या तिन्ही भूमिकांतील हुशारी आणि असत्ये दृग्गोचर करतानाच संघ आणि मोदी हे गांधींचे कशा प्रकारे अपहरण करू पाहात आहेत हे दाखविणे हा या पुस्तकाचा हेतू असल्याचे तिस्ता यांची प्रस्तावना सांगते. गांधीजींच्या सेक्युलरत्वाचा शोध घेता घेतासंघास त्यांचे नेमके का वावडे होते हे त्यांनी यातून दाखवून दिले आहे. गांधींबाबत नेहमीच एक अडचण होतेती म्हणजे ते सत्याचा सापेक्ष आणि निरपेक्ष अशा दोन पद्धतीने विचार करीत असत. सापेक्ष सत्य हे बदलू शकतेहा त्यातील महत्त्वाचा भाग. माझे आजचे आणि कालचे मत यांत भेद असेलतर माझे आजचे मत प्रमाण मानावेअसे ते सांगत तेव्हा ते सापेक्ष सत्याबद्दलच बोलत असत. परंतु भल्याभल्यांची यामुळे दांडी उडाली आहे. परिणामी गांधींचे चातुर्वण्र्यविषयक विचार घेऊन त्यांच्यावर टीका करणारे आजही सापडतात. या पाश्र्वभूमीवर तिस्ता यांनी गांधींच्या जातीय आणि धार्मिक मतांबाबत निर्णय देताना ते अखेरीस सेक्युलरत्वापर्यंत आल्याचे नमूद केले आहे. हा महत्त्वाचा मुद्दा असूनत्यावर अधिक चर्चा होणे खरोखरच आवश्यक आहे. प्रस्तावनेत त्यांनी चर्चिलेले विविध मुद्दे पुढे पुस्तकात वेगवेगळ्या लेखांच्या आणि पुराव्यांच्या स्वरूपात पुढे येतात. त्यात अर्थातच सरदार पटेल यांचा संघाविषयीचा पत्रव्यवहार पाहण्यासारखा आहे. सरदार हे जणू गांधींच्या मरणाची वाटच पाहात होतेकिंबहुना सरदार हे प्रच्छन्न हिंदुत्ववादी होते अशा प्रकारे त्यांची प्रतिमा रंगविण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांत सुरू आहेत. त्यांवर या पत्रव्यवहाराने पाणी पडतेचपरंतु सरदारांना संघविचार अजिबात मान्य नव्हता हेही समजते. अर्कायव्हल ट्रथमधील या नोंदी पाहिल्यावर मोदी हे सरदारांचा पुतळा का उभारत आहेतया प्रश्नाचे नेमके उत्तर मिळून जाते. यातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर तातडीने नष्ट करण्यात आलेल्या फायलींबाबतचा माहिती अधिकार कायद्याखाली झालेला पत्रव्यवहार. या फायलींत अशी कोणती रहस्ये होती हे सरकारने दडवून ठेवले आहे. त्याच्या नोंदीच सरकारकडे नाहीत किंवा त्या दिल्या जात नाहीत. त्याबाबत वेंकटेश नायक यांनी केलेला अर्जत्यास आलेले उत्तर तसेच या फायलींचे सत्य जाणून घेण्यासाठी देशातील अनेक मान्यवरांनी केलेली ऑनलाइन याचिका हे सर्व या भागात येते. नेताजींबाबतच्या फायली खुल्या करणारे हे सरकार या फायलींबाबत मात्र स्पष्ट काही सांगत नाही हे सारे संशयास्पद असल्याचे हे पुस्तक नोंदवून जाते. या भागातील धक्कादायक प्रकरण आहे ते त्रिदीप सुहृद यांचे. त्याचे शीर्षक – रीएडिटिंग गांधीज् कलेक्टेड वर्क्‍स. हा इकॉनॉमिक अ‍ॅण्ड पोलिटिकल वीकली’ (२० नोव्हें. २००४) मध्ये प्रसिद्ध झालेला लेख. केंद्र सरकारच्या माहिती-प्रसारण खात्याच्या प्रकाशन विभागाने प्रसिद्ध केलेले आणि के. सुदर्शन यांच्यासारख्या विद्वानाच्या नेतृत्वाखालील संपादक मंडळाने संपादित केलेले गांधींच्या समग्र वाङ्मयाचे खंड हा एक मोलाचा ठेवा. परंतु १९९८ मध्ये या खंडांचे फेरसंपादन करण्यात आले. त्यांत अनेक बदल करण्यात आले. काही संदर्भ गाळण्यात आले. एवढेच नव्हे तर काही कागदपत्रांचेपत्रांचे सोयीस्कर भाषांतर करून ते या खंडांत घुसडण्यात आले. हा उद्योग कशासाठी करण्यात आला हे समजण्यासाठी त्या काळात केंद्रात वाजपेयींचे सरकार होते हे माहीत असण्याची गरज नाही. गांधी व त्यांचे द. आफ्रिकेतील मित्र हर्मन कलेनबाख यांच्यातील पत्रव्यवहाराची मानसशास्त्रीय तपासणी’ करून गांधी हे समलैंगिक संबंध ठेवणारे होते अशी मांडणी करणारे लेख प्रसिद्ध झाले आहेत. याचा एक पुरावा कायतर गांधींच्या काही पत्रांच्या अखेरीस सीनली युवर्स’ असे लिहिलेले होते. आता सीन्सिअर्सली हा शब्द पूर्वी सीनली असाही संक्षेपाने लिहीत हे बहुधा माहीत नसल्याने असा घोळ घालण्यात आला. हे पाहता भाषांतरातील घोळाने पुढे काय होऊ शकते याचा अंदाजही लावणे कठीण आहे. गांधी संपविण्यासाठी काय काय सुरू आहे याचा हा एक नमुना मांडून हा विभाग संपतो.

पुढच्या विभागात जे लेख येतात ते मात्र अनेकांनीखासकरून मराठी वाचकांनी आधीच (मराठीत) वाचले असण्याची शक्यता आहे. यांत आधुनिक विनोबा अशी ओळख असलेल्या चुन्नीभाई वैद्य यांच्या एका पुस्तिकेचे भाषांतरडॉ. य. दि. फडके यांच्या नथुरामायण’ या पुस्तकातील काही भागांचे भाषांतर आणि जगन फडणीस यांच्या महात्म्याची अखेरमधील काही भागांचे भाषांतर यांचा समावेश आहे. वैद्य आणि फडके यांचे लेख म्हणजे नथुराम गोडसेवरील नाटकाचे (मी नथुराम गोडसे बोलतोयचे) केलेले वैचारिक शवविच्छेदन. सत्याचा अपलापअर्धसत्येकल्पनाविलास या वापरातून नथुराम गोडसे याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न कशा प्रकारे केला आहे हे या दोन्ही लेखकांनी त्या वेळीच साधार स्पष्ट केले होते. याशिवाय जगन फडणीसांसह या तिघाही जणांनी नथुराम हाच कसा खोटे बोलत होता हेही दाखवून दिले आहे. ५५ कोटींचे बळी’ वगैरे सगळा प्रचाराचा भाग होता आणि १९४८ पूर्वीही गांधींना मारण्याचे किमान सहा प्रयत्न झाले होतेहे अनेकांना माहीत आहेच. परंतु नथुराम यास सावरकरांचा आशीर्वाद होता’, ‘तो दधिची ऋषीसारखा होता’, ‘धीरोदात्त नायकासारखा तो वधस्तंभास सामोरा गेला’ वगैरे सर्व बाता असूनवस्तुत: संपूर्ण खटल्याच्या कालखंडात सावरकर त्याच्याकडे दुर्लक्षच करीत होते आणि त्यामुळे नथुराम अस्वस्थ असे. ज्यांची काही निरीक्षणे घेऊन नथुराम याच्या न्यायालयातील भाषणाचे कौतुक केले जातेत्या न्यायमूर्ती खोसला यांनीच नथुराम फासाकडे जाताना कसा घाबरला होता आणि ते लपविण्यासाठी कापऱ्या आवाजात अखंड भारताच्या घोषणा देत होता हे नमूद केले आहेअसे या भागातील काही उल्लेख प्रचलित सत्यांना छेद देत मिथकभंजन करणारे नक्कीच आहेत. याशिवाय यात रा. स्व. संघाच्या विचारसरणीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारे लेख आणि त्याबाबतच्या कागदपत्रांचे संदर्भही देण्यात आले असूनत्यांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (१९७९) या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक देशराज गोयल यांचा संघ आणि गांधीहत्या यावर भाष्य करणारा लेख उल्लेखनीय आहे. पुस्तकाच्या अखेरच्या भागात गोपाळ गोडसे यांच्या फ्रंटलाइनमधील (१९९४)तर तत्कालीन सरसंघचालक रज्जूभय्या यांच्या आऊटलुकमधील (१९९८) मुलाखतीचा भाग असूनते पुस्तकाच्या एकूण मांडणीला धरूनच आहे.

आजच्या काळात ही मांडणी आवश्यकच होती. एकीकडे गांधींचे चारित्र्यहननदुसरीकडे त्यांच्या मारेकऱ्यांचे उदात्तीकरण आणि त्याच वेळी गांधींचे सम्मीलीकरण अशा मार्गानी गांधीविचारांवर होत असलेल्या हल्ल्यांची उत्तरपूजा करण्याचे काम हे सर्व लेख करतात. ते पुस्तकस्वरूपात एका सूत्रात गुंफून आले ते बरेच झाले. अधिक व्यावसायिक पद्धतीने त्याची मांडणीआकार आणि संपादन झाले असतेतर पुस्तक अधिक साजरे झाले असते.


बियाँड डाऊट- ए डॉसियर ऑन गांधीज् असॅसिनेशनसंकलन : तिस्ता सेटलवाड,प्रकाशक : तूलिका बुक्सदिल्लीपृष्ठे : २७८किंमत : ४५० रु.

(पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता)

Popular posts from this blog

त्यांचे असत्याचे प्रयोग!

गांधी नावाचा गुन्हेगार!

‘कुजबूज क्लाऊड’जन्य प्रोपगंडावरील प्रभावी उतारा - गांधी का मरत नाही