त्यांचे असत्याचे प्रयोग!
गांधींविषयी गैरसमज पसरविणा-या , त्यांचे चारित्र्यहनन करणा-या अशा अनेक गोष्टी पसरविल्या जात आहेत. त्यांची बनावट चित्रे तयार करून ती प्रसारित केली जात आहेत. याचा हेतू एकच असतो - गांधींचा सहिष्णुतेचा , सर्वधर्मसभावाचा , सत्य आणि अहिंसेचा विचार पुसून टाकणे. एकदा तो विचार मागे पडला , की मग एक पुतळा म्हणून वा एक चष्मा म्हणून गांधींना मिरविण्यात या विरोधकांची काहीही हरकत नसते. आज त्या असत्याचे प्रयोग जोमाने सुरु आहेत … महात्मा गांधींबाबत एक विचित्र प्रकार सध्या सुरू आहे. देशात भाजप सत्ताधारी आहे. या पक्षाचे सध्याचे सर्वोच्च नेते आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. ते महात्मा गांधींची सातत्याने पाद्यपूजा करताना दिसतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपची मातृसंस्था. गांधीजी हे तिला फारा वर्षांपासून प्रातःस्मरणीय आहेत. आणि याच संस्थेच्या परिघावर असलेल्या काही संघटना , संघीय-हिंदुत्वाचा विचार मानणा-या अनेक व्यक्ती , भाजपचे अनेक नेते , त्यांचे ट्विटरवरील समर्थक , जल्पक हे सारे महात्मा गांधींचा मनःपूर्वक द्वेष आणि नथुराम गोडसेवर हार्दिक प्रेम करत...